( कृषी उत्पन्न बाजार समित्यातील गैर प्रकार बंद करण्यची मागणी )
महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कायद्याची पायमल्ली करत शेतकर्यांची प्रचंड प्रमाणात लूट होत आहे. पणन संचालकांनी अधिकाराचा वापर करून बाजार समित्यातील सर्व गैर प्रकार बंद करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये १९६३ साली कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम लागू करण्यात आले. शेतीमाल व्यापाराची कार्यप्रणाली निश्चित झाली मात्र ५७ वर्षा नंतर ही राज्यात व राजधानीत सुद्धा अधिनियमांची अंमलबजावणी झालेली नाही. सर्व शेतीमालाची जाहीर लिलाव पद्धतीने विक्री करण्याचा कायदा असताना आज ही नवी मुंबईतील वाशी बाजार समितीत रुमालाखाली हातची बोटे चाचपुन शेतीमाल विकला जातो. अाडत्या देईल ते पैसे शेतकर्याला घ्यावे लागतात. अवास्तव हमाली आकारली जाते. कडता या प्रकारात मालाचे वजन कमी धरले जाते. वजन काटे योग्य नसतात. लातूर बाजार समितीत, आवक झालेल्या सर्व शेतमालाचा लिलाव केला जात नाही. पोटली, सॅंपल व पायली या प्रथेद्वारे शेतकर्याचा माल लुटला जातो व दर ही कमी दिले जातात. २४ तासात पैसे देण्याचा नियम असताना आठवडा – पंधरा दिवसाने पैसे दिले जातात. इतर ही अनेक बेकायदेशीर कपाती करून शेतकर्यांची फसवणुक केली जाते.
शेतकरी संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या नंतर संबंधीत मंत्री, पणन विभाग व बाजार समित्यांकडे सुधारणा व कारवाईची विनंती करूनही दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
दि. २ डिसेंबर २०२० पासून पुणे येथील पणन संचालक कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत आंदोलन सुरू राहील. ज्या शेतकर्यांची लूट झाली आहे त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन आपली तक्रार नोंदवायची आहे. शेतकरी ते ग्राहक अशी संरचना उभी करू इच्छीणार्या उद्योजकांनी सुद्धा आंदोलनात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यसाठी येणार आहेत. स्वतंतत्रतावादी विचाराच्या संघटना व पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर करून आंदोलनात भाग घ्यावा. खुल्या व्यवस्थेचे समर्थक व अभ्यासकांनी धरणे आंदोलन स्थळी आपले विचार मांडावेत अशी शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण व पश्चिम महाराष्ट्र महिला अघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे करणार आहेत. शेतकर्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.
३०/११/२०२०
अनिल घनवट
अध्यक्ष, शेतकरी संघटना.