*कोविडमुळे निधन झालेल्या कुटूंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार*
*-सुनील केदार*
*‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ बालकांना व विधवांना साहित्यांचे वितरण*
नागपूर, दि. 30 : कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांच्या व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत. अशा आपदग्रस्तांचे नुकसान व वेदना दूर सारण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्राधान्याने लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
सावनेर व कळमेश्वर तालुक्यात ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना श्री. केदार यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे, जि. प. सदस्य प्रकाश खापरे, देवानंद कोहळे, पंचायत समिती सभापती जयश्री वाळके, उपसभापती अरुणा शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गुणवंत चौधरी, बाबाराव पाटील, संचालक नरेश गोतमारे, प्रदीप चेचरे, उपविभागीय अधिकारी अतुल मेहेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, सचिन यादव यांच्यासह ग्रामस्थ, महिला मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. केदार म्हणाले की, कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच आवश्यक प्रमाणपत्रांची पुर्तता करुन त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनाथ बालकांचे सुरळीत संगोपन होण्यासाठी त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या महिला भगिनींना संजय गांधी निराधार योजनेसह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे.
- ते पुढे म्हणाले की, कोविडमुळे हानी झालेल्या कुटुबीयांचे नुकसान किंवा वेदना भरुन निघणाऱ्या नाही. पंरतू, अशा आपदग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवून त्यांना पुन्हा आयुष्यात उभे राहता यावे, यासाठी शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा आर्थिक व सामाजिकदृष्ट्या विकास होण्यासाठी तालुका प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तिंच्या वारसांना सातबारा फेरफार, मालमत्ता प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, शिधा पत्रिका, अनाथ प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक दाखले आदी त्वरेने उपलब्ध करुन देण्यात यावीत. शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध जणकल्याणकारी योजनांचा लाभ तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात यावा, असेही श्री. केदार यांनी सांगितले.
सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना मदत म्हणून प्रशासनाद्वारे श्री. केदार यांच्या हस्ते अन्नधान्याचे किट, विधवा भगिनींना साळीचोळी, विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. तसेच कोविडमुळे मृत पावलेल्या वारसांना सातबारा उतारा, शिधा पत्रिका, अनाथ प्रमाणपत्र, कृषि बी-बियाणे, यंत्र सामुग्री, ट्रॅक्टर वाहन, राष्ट्रीय कृषी योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून शंभर टक्के अनुदान तत्वावर विहीर मंजूर लाभार्थ्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या कु.राणी करांडे व पूर्वा करांडे या दोन विद्यार्थींनींच्या नावे असलेली पाच लाख रुपयाचे मुदत ठेवचे प्रमाणपत्र श्री. केदार यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले.