नागपूर, दि.१६ : खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूर, विदर्भाला देशभरातील विचारवंत, कलावंतांना ऐकायला, पाहायला, अनुभवायची संधी दिली. महोत्सवाची ही पर्वणी अशीच लाभत राहील,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी आज खासदार सांस्कृतिक महोत्सवास भेट दिली. त्यावेळी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे, आ.मंजूळा गावित, आ.अमित गोरखे, माजी आमदार अनिल सोले, दैनिक हितवादचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र पुरोहित, उद्योजक यशपाल आर्य, पदमेश गुप्ता, यशपाल गुप्ता आदी उपस्थित होते.देशभरातीलच नाही तर आपल्या भागातील कलावंतांसाठी देखील खासदार सांस्कृतिक महोत्सव मोठे व्यासपीठ, दालन ठरले आहे. महोत्सवातील वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धांमधून नागपूरचे सांस्कृतिक क्षेत्र ढवळून निघेल. यासाठी आयोजन समितीचे आभार मानतो. मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातील हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे; त्याचा विशेष आनंद आहे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे बोलतांना म्हणाले.
महोत्सवातील कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात. हा महोत्सव नागपुरकरांच्या जीवनाचा अंग झाला आहे.कुमार विश्वास यांच्या सारख्या लेखक, कवी, विचारवंताच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. कुमार विश्वास उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात. ते केवळ तत्वच सांगत नाही तर तात्विकतेने जगत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमास देखील मुख्यमंत्री श्री.फडणवीस उपस्थित राहिले.
खासदार महोत्सवातून स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मनोरंजनातून सांस्कृतिक अभिरुची, लोकप्रबोधन, लोकसंस्कार होत आहे. महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य, समर्थन लाभते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
Home सामाजिक खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपुरकरांना देशभरातील कलावंतांना अनुभवायची पर्वणी दिली – मुख्यमंत्री देवेंद्र...