नागपूर, दि. 17 – राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अऩावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील,असेही श्री. मुंदडा यांनी सांगितले.आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे, पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.
Home Breaking News महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण