मौदा (तालुका प्रतिनिधी):- मौदा हे तालुक्याचे ठिकाण असून मागील अनेक वर्षांपासून डाक विभागाचा कारभार हा भाड्याच्या इमारतीतून सुरू आहे. मौदा बसस्टँड परिसरात असलेल्या या डाक कार्यालयात अनेक समस्या असून स्थानिक जनप्रतिनिधी या समस्येकडे हेतुपररस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सद्या सुरू असलेले डाक कार्यालय दहा बाय दहाच्या दोन खोलीत सुरू आहे. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असून पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. गेल्या १० दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळें येथील ऑनलाइन ची कामे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करून आल्यापावली परत जावे लागत आहे.
पुर्वी डाक कार्यालय ते डाक कार्यालय सीपी नेटवर्क सुरू होते.आत ती सेवा बंद करून बीएसएनएल चे नेटवर्क जोडण्यात आले तेव्हापासूनच नेटवर्क अभावामुळे ऑनलाइन चे कामे खोळंबली आहेत.
बीएसएनएल चे कर्मचारी, अधिकारी येऊन पाहून जातात परंतु समस्या दूर होत नसल्यामुळे सर्व जबाबदार अधिकारी या समस्ये बाबत एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करत आहे. व याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे.
डाक विभागात सुध्दा सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होत असल्यामुळे अनेक नागरिकांची महत्वाची कामे वेळेवर होत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
————————————
पोस्ट ऑफिस ते पोस्ट ऑफिसमध्ये सीपी चे नेटवर्क होते तेव्हा ठिक होते. परंतु दि.९ डिसेंबर पासून बीएसएनएल नेटवर्क जोडण्यात आले. तेव्हापासून नेटवर्क अभावी कामे होत नाही. रोज बीएसएनएल चे कर्मचारी, अधिकारी येतात परंतु त्यांना फाल्ट सापडत नाही. त्यामुळे आम्हालाही काही करता येत नाही नाही.
– एच.सुरराऊत,पोस्ट मास्तर,
डाक कार्यालय,मौदा
————————————-
हा दोष त्यांच्या सिस्टम चा आहे, अडचण दुर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्याकडून ती अडचण लवकरच दूर करण्यात येईल.
– चंद्रप्रकाश बिटला,ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर, बीएसएनएल,कार्यालय,मौदा