गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर :-
सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या कामाला आधी ग्रामसेवक व नंतर कृषी सहायकांनी नकार दिल्यानंतर आता तलाठ्यांनी नकार दिला आहे. यासाठी तलाठ्यांनी तहसीलदार रोशन मकवाने यांना तर कृषी सहायकांनी तालुका कृषी अधिकारी डॉ.योगीराज जुमडे यांच्याकडे निवेदनाच्या प्रती सोपविल्या आहेत.
ग्रामसेवकांच्या नकारा मागेच महसूल विभागातील तलाठी आणि कृषी विभागातील कृषी सहायकांनीही या प्रकल्पाचे काम करण्यास नकार दिला. तलाठ्यांच्या संघटनेने तहसीलदार रोशन मकवाने यांना आणि कृषी सहायकांच्या संघटनेने तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांना निवेदन देऊन त्यांचा नकार कळविला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्तिपत्रे जारी होताच त्यांच्यात नाराजी व्यक्त व्हायला सुरुवात झाली. ग्रामसेवक व कृषी सहायक काम करायला तयार नसतील तर एकट्या महसूल विभागानेच ही कामे करावी का, असाप्रश्नही तलाठ्यांनी उपस्थित केला आहे.शिष्टमंडळात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शरद बोरकर व सुरेश बोरीकर, तलाठी गजानन जोंधळेकर, शैलेश रामटेके, मिलिंद चौधरी, राखी झोरे, नीता मेंघरे, प्रवीण ठाकरे, सतीश मुदगल, दर्शना अंबादे, स्नेहल नाईक, सायंका रावळे यांचा समावेश होता.
कृषी विभागाची भूमिका गावपातळीवर शेती व शेतकऱ्यांचे महसुली अभिलेख महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्यांकडे असतात. त्यामुळे तलाठ्यांनी सर्व शेतकरी खातेदाराबाबतची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्यांनी त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची ओळख ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये करून घेऊ शकतात. त्यांचे आधार प्रमाणीकरण करणे त्यांना सहज शक्य होईल. तलाठी व ग्रामसेवक हे काम स्वतः किवा त्यांच्या मदतनीसांकडून करून घेऊ शकतात,अशी भूमिका कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी घेत या कामाला नकार दिला आहे.
तर कृषी विभागाकडे आधीच मनुष्यबळ व साधनांची कमतरता तसेच बैठकीच्या जागेची समस्या आहे. या अभावात कामे प्रलंबित राहिल्यास किंवा वेळेवर काही अडचणी निर्माण झाल्याने त्याचा शेती व शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर परिणाम होणार आहे. यासाठी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले जाणार असून, शेतकरी, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने कृषी विभागातील कर्मचारी या कामाला नकार देत आहेत. शासन व प्रशासनात कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना दिली जाणारी सापत्न वागणूक, कृषी सहायकांच्या पदनामात न केलेला बदल याही बाबी त्यांच्या नकारास कारणीभूत आहेत.कृषी सहायकांनी या कामाला नकार देत तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात कृषी विभागाचे ए. जी. कंकाळे, ए. जी. गजबे, आर. आर. कोल्हे, आर. पी. नान्हे, एस. व्ही. वाहाने, एस. एस. इंगोले, के. व्ही. वाहुळे, एम. आर. बाविस्कर, पी. एस. फलके, पी. एस. मोहोड यांचा समावेश होता.